About Book:
“इंद्रधनुष्य” या कथासंग्रहात लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाचायला अगदी सरळ आणि सोप्या भाषेत सर्वांना सहज समजतील अश्या कथांचा समावेश केलेला आहे. सर्वच कथांमधून वाचकांना प्रेरणादायी संदेश मिळेल याची दक्षता ठेवूनच लिहिण्याचा हा पहिला-वहिला प्रयत्न. यात बालवयातील लग्न, मुलांचा आत्मविश्वास, खोडकरपणा, आईचं कुटुंबातील स्थान, स्त्री-पुरुष समानता, समाजसेवा, याव्यतिरिक्त अनेक म्हणींचा वापर करून त्यावर आधारित कधी काल्पनिक तर कधी सत्य घटनांवर आधारित मनोरंजक, नाटकीय शैलीने कथा लिहून वाचकवर्ग वाचतांना प्रेरित होऊन अर्थपूर्ण बोध घेतील, या आशेने लिहिलेल्या आहेत.
एका गरीब मुलीचं शिकून खूप मोठं होण्याचं स्वप्न, तिचा आत्मविश्वास, तिचं धाडस..चिकाटीने कसून अभ्यास करून येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाऊन कलेक्टर बनून अपूर्ण असलेलं स्वप्न पूर्णत्वास नेणारी चिमुकली....
आपल्या मुलींनी शिकून खूप मोठं नाव कमवावं म्हणून घरोघरी धूणी-भांडी करून पोरींना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी नवऱ्याच्या हातचा मार खाणारी शालू....
एका अनाथ मुलाचं डाक्टर बनून समाजसेवा करण्याचं साकार होणारं स्वप्न...
अश्या अनेकविध मनाला हेलावून टाकणाऱ्या कथा वाचतांना कधी मनाला
चटका लावून जातात तर कधी ह्रदय पिळवटून टाकतात.
मनात इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीच नसतं, ‘मी हे करू शकते’ हा आत्मविश्वास, संयम, धाडस, कष्ट घेण्याची प्रवृत्ती, नवीन गोष्ट शिकण्याचा मानस, जबर इच्छाशक्ती, येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य ज्या व्यक्तींमध्ये आहे, त्यांची स्वप्न कधीच अपूर्ण राहणार नाहीत. हेच यशाचं गमक आहे.
ही इंद्रधनुष्यरूपी सप्तरंगी ‘सप्तसूत्री’ ज्या व्यक्तींमध्ये आहे ती नक्कीच यशस्वी होऊन उत्तुंग गगनभरारी मारू शकते, हेच प्रत्येक कथा आपल्याला शिकवते.
About the Author:
चारुलता जुगल राठी. माझा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. बारावी सायन्सनंतर मराठी साहित्याची आवड म्हणून बी.ए. मराठी साहित्यामध्ये केलं. वाचनाची आवड म्हणून ग्रंथालय शास्त्राची पदवी संपादन केली. इथेच खरी पुस्तकांशी गट्टी जमली, त्यात वडील पेशाने शिक्षक म्हणून पुस्तकांशी आपसुकचं नाळ जोडली गेली. वाचन करता-करता लिखाणाची आवड निर्माण झाली. शालेय स्पर्धेत लिहिता-लिहिता लिहिण्याची उर्मी वाढत गेली. लिहिण्यासाठी उत्तम व्यासपीठ हवं असं मनात असतांनाच स्टोरीमिरर या नामांकित पोर्टलशी जोडली गेले. विविध स्पर्धेच्या माध्यमातून कथा, कविता, कोट्स लिहीत गेले. अनेक प्रमाणपत्र, ट्रॉफी बक्षीस म्हणून मिळाली.
आणि काय आश्चर्य! स्टोरीमिरर जॉईन करून फक्त एकच वर्ष झालं, आणि “ऑथर ऑफ द इयर 2020” च्या यादीत मी टॉप 10 मध्ये, म्हणजेच सातव्या स्थानावर आले. माझ्यासाठी हे खूप गौरवास्पद होतं. ज्या पोर्टलवर लाखोंच्या संख्येत वाचकवर्ग आहे, तिथे माझे लेखन वाचकांच्या पसंतीस उतरावे याहून मोठं स्वर्गीय सुख कोणत असावं!
माझ्यासारख्या नवख्या लेखिकेसाठी ही खूप अभिमानाची बाब ठरली. माझं स्वप्न होतं, आपलंसुद्धा एक तरी पुस्तकं असावं! पण इतक्या कमी वेळात माझं स्वप्न पूर्ण होईल ही अपेक्षा नव्हती. पण! माझ्या लिखाणाला अशी गोड दाद देऊन स्टोरीमिररने माझ्या लेखणीला कौतुकाची थाप देऊन अनमोल संधी दिली. म्हणूनच आज माझं पहिलं पुस्तक “इंद्रधनुष्य” आपल्यासमोर आहे.