पुस्तक बद्दल:
स्त्री-पुरुष विषमता सर्व पुरुष सत्ताक समाजात पूर्वापार चालत आली आहे; ती भारतात अधिकच प्रकर्षीने जाणवते. हिंदू धर्मात आदि काळापासून वेद पठणाचा व गायत्री मंत्र उच्चIरण्याचा अधिकार स्त्रियांना नाकारला गेला. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा समता व समन्वय हा मूळ मंत्र. पण वारकरी चळवळही स्त्रियांच्या धार्मिक व सामाजिक विषमतेच्या प्रश्नाला हिरीरीने भिडलीच नाही. तरी सर्व धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक व लैंगिक अवरोधावर मात करत मुक्ता, ललद, मीरा, जना, बहिणा, आंडळ व अक्क महादेवी या संत स्त्रिया आपल्या व्यक्तिमत्तवाचा व विचारांचा संपन्न वारसा ठेवून गेल्या. संन्यासाची संतती म्हणून समाजाने वाळीत टाकल्यामुळे ज्ञानेश्वर भावंडाना उपनयनादी संस्कारांचा अधिकार नाकारला गेला. सामाजिक अन्याया बरोबर तिला दीर्घ कौटुंबिक संघर्षही करावा लागला. मीराबाईच्या परंपरानिष्ठ राजपूत समाजात सासर-माहेर-समाज अशी सर्व पातळीवर विरोध सहन करावा लागला पण तिच्या आत्यंतिक मनस्विते मुळे तिने सर्व बंधने झुगारून येईल त्या प्रसंगाला निष्ठुरतेने तोंड दिले. काश्मीरची संत ललद व अक्क महादेवी यांचा जीवन यात्रा काही वेगळी नव्हती. आंडलने तर विवाह संस्थाच नाकारली व अध्यात्माच्या मार्गावर अढळ राहिल्या. मात्र ह्या सर्व निष्ठावंत साधकाच्या एक जगावेगळे साम्य होते. ते म्हणजे त्या सर्वांचा अंत हे एक कायमचे गूढ राहिले. त्या सर्व ब्रह्ममय झाल्या हे खरे. पण लौकिक पातळीवर त्यांचे निर्वाण एक प्रश्न चिन्ह मागे ठेवून गेले.