महाभारताचं महायुद्ध समाप्त झालं. कौरवांच्या कुळाचा पूर्ण संहार झाला होता. सगळी युद्धभूमा प्रेतांच्या खचाने भरून गेली होती. रक्ताच्या ओहळांनी भिजून गेलेल्या भूमीवर, तो मुत्सद्दी राजकारणी, रणनीतीकार कृष्ण उभा होता. आणि त्याच्या आजूबाजूला होत्या कुरु स्त्रिया, ज्यांचे पती, बंधू, पिता आणि पुत्र युद्धात बळी गेले होते. त्या त्याला शिव्याशाप देत होत्या. या भयकारी स्थितीला जबाबदार कोण होता? दुसरा-तिसरा कुणी नाही, तर स्वतः प्रभू, परमेश्वर. ज्याने स्वतः जाहीर केलं होतं की, पृथ्वीला पापांच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी तो अवतार धारण करेल. त्यामुळे जेव्हा मातांनी त्याला 'तुझ्या नशिबीदेखील असेच भोग येतील' असा शाप दिला, तेव्हा परमेश्वराने तो मंदस्मित करत शांतपणे स्वीकारला. अशा प्रकारे या कादंबरीची सुरुवात होते, ज्यात लेखक संजीब चट्टोपाध्याय प्रभू कृष्णाच्या जीवनाचा धांडोळा घेतात. विष्णूच्या अवतारांपैकी एक असलेल्या या अवताराच्या जीवनातल्या महत्त्वाच्या क्षणांकडे निर्देश करतात गोकुळातला खट्याळ मुलगा, वृंदावनातला रहस्यमयी प्रेमिक, कंसाचा वध करणारा, द्वारकेमधला यादवांचा प्रमुख आणि अखेरीस कुरुक्षेत्रावरच्या महायुद्धाची आखणी करणारा मुत्सद्दी राजकारणी !