"प्रस्तुत पुस्तकात भारतातील बौद्ध धम्म, ब्राह्मणी धर्म आणि जात यांच्या
२,५०० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीचा विशेष अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न
केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धम्माचे आकलन या
प्रयत्नाचा आरंभबिंदू आहे, बौद्ध धम्माचे ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय
आणि तात्त्विक पैलू पुढे आणण्यासाठी गेल ऑम्व्हेट यांनी बौद्ध साहित्याचे
मूळ स्रोत आणि उपलब्ध नवीन साहित्य या दोन्हींचे केलेले संशोधन आहे. या
प्रक्रियेत त्यांनी वर्तमानदृष्ट्या आस्थेच्या अशा महत्त्वाच्या अनेक विषयांची
चर्चा केली आहे.
गेल ऑम्व्हेट यांचे असे प्रतिपादन आहे की, डॉ. आंबेडकरांसारख्या
दलित नेत्यांनी बौद्ध परंपरेच्या पायाला धक्का देणारी मीमांसा केली असली,
तरी त्यांचे क्रांतिकारक धैर्य मूळ बौद्ध धम्मातील विचारप्रणालीशी सुसंगतच
आहे. शोषणाविरुद्धचा मार्क्सवादी पद्धतीचा ‘चिलखती’ प्रतिसाद आणि
हिंदुत्वाच्या चौकटीतील निष्प्रम सुधारकी प्रयत्न हे दोन्हीही टाळून
आंबेडकरांनी मध्यम-मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या आधीही काहींनी असे
प्रयत्न केले आहेत, पण आंबेडकरांचे वैशिष्ट्य हे की, त्यांनी बुद्धाच्या
शांतिसंदेशाला दलितांच्या सामाजिक व राजकीय क्रांतीच्या हत्याराचे स्वरूप
दिले. दुसरे म्हणजे, दोन धार्मिक प्रवाहांमध्ये प्रभुत्वाची स्पर्धा सतत सुरू
असल्याने लेखिकेचे असे मत आहे की, ख्रिस्तपूर्व चौथे शतक ते ख्रिस्तपूर्व
सहावे शतक या काळातील बौद्ध धम्माचे अग्रस्थान लक्षात घेता, प्राचीन
भारताला ‘हिंदू भारता’ ऐवजी ‘बौद्ध भारत’ म्हणायला हवे.
जातिव्यवस्थेचा उगम व विकास यांची संपूर्ण ‘नवीन’ मीमांसा या
पुस्तकात सापडेल. ही मीमांसा इतिहासाच्या हिंदुत्ववादी अर्थांकनाला
धीटपणे प्रश्न विचारते. भारताच्या सांप्रत राजकीय व सामाजिक स्थितींबाबत
आस्था असणाऱ्या सर्वांना हे पुस्तक बोधप्रद ठरेल. त्याचप्रमाणे,
समाजशास्त्रज्ञ, राजकीय अभ्यासक, इतिहास-संशोधक, धर्म व तत्त्वज्ञान या
विषयाचे विद्यार्थी आणि दलित चळवळी यांनाही हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल."