"उपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीच्या आधारे एका क्षणात (निमिषार्धात)
निर्णय घेण्याची अद्भुत क्षमता आपल्या मेंदूत सतत कार्यरत असते. पण तिचे
अस्तित्व आपल्या जागृत मनाला बऱ्याच वेळा कळत नसतं. ‘ब्लिंक’ या
पुस्तकात विविध क्षेत्रांतील विस्मयकारक उदाहरणे सोप्या भाषेत देऊन अबोध
मनातील या प्रक्रियेमागील गूढ उकलण्याचा प्रयत्न केला आहे. नाटककार,
प्राध्यापक, गुंडांचा पाठलाग करणारे पोलीस, युद्धाचे डावपेच आखणारे
सैन्यातील जनरल, नोकरीसाठी मुलाखत घेणारे, बुद्धयंक मापनासारख्या
मानसशास्त्रीय चांचण्या, मोटर-कार सेल्समन, व्यवस्थापन सल्लागार, वकील,
विवाह सल्लागार, खेळाडू, आपत्कालीन विभागातील डॉक्टर, मार्केटिंग तज्ज्ञ,
संगीतकार, वधू-वर मेळाव्यातील युवक-युवती, खाद्यपदार्थांच्या चवीतील
तज्ज्ञ, चेहरा वाचणारे तज्ज्ञ, स्वमग्नता (ऑटिझम), अशा विभिन्न क्षेत्रांतील
उदाहरणे देऊन मानसशास्त्र आणि मानवी वर्तन यासारख्या गहन विषयांचा
गाभा सोपा करून सांगितला आहे.
‘ब्लिंक’ हे माल्कम ग्लॅडवेल यांचे लोकप्रिय विज्ञान या प्रकारातील
‘आऊटलायर’ नंतरचे दुसरे पुस्तक. या पुस्तकात त्यांनी अबोध मनाच्या
मानवी वर्तनावरील प्रभावावर आधुनिक मानसशास्त्रीय संशोधनाच्या आधारे
प्रकाश टाकला आहे. त्यात प्रामुख्याने आपल्या मनात उमटणाऱ्या प्रथमदर्शी
प्रतिमेच्या प्रभावाचे फायदे-तोटे यांचं उदाहरण देऊन स्पष्टीकरण दिलं आहे.
अबोध मनाच्या मनोव्यापारांवर प्रकाश टाकलेला आहे.
वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ, मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि सामान्य वाचक
कोणालाही एकदा सुरुवात केल्यावर शेवटपर्यंत वाचल्याशिवाय राहवणार
नाही असे, सर्व थरांतील व्यक्तींनी वाचलेच पाहिजे, असं पुस्तक."