गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व सविस्तर चरित्र आजपर्यंत कोणीही लिहिले नाही. तसेच गौतमबुद्ध आणि संत तुकाराम यांचे पहिले चरित्रकारही केळूसकरच आहेत.' राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती माधवराव रानडे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी गुरुवर्य केळूसकरांच्या लेखणी व विचारांची प्रशंसा केली. ते धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते. पण बहुजनसमाजाच्या लेखकाच्या वाट्याला येणारी फरपट केळूसकरांच्या वाट्याला आली. महाराष्ट्राच्या वाङमयमहर्षीची उपेक्षाच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे. भारतभूमीला यवनसत्तेपासून मुक्त करण्याचा सत्संकल्प केलेल्या या महाप्रतापशाली वीराने सर्व जाती-धर्मांच्या मदतीने, मुत्सद्दीपणा व गनिमी कावा या कौशल्याने हिंदवी स्वराज्य उभारिले. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामान्यांचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करत शत्रू पक्षांवर मात केली. मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवलेल्या छत्रपती शिवरायांचे मराठीतील हे चरित्र एक उत्तम उदाहरण आहे. केळूसकर गुरुजींचा हा ग्रंथ म्हणजे केवळ शिवाजी राजांचा चरित्रग्रंथ नसून त्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थकारण, नेतृत्व, चारित्र्य, मानवी संबंध अशा अनेक विषयांची तपशीलवार मांडणी आहे. हा युगपुरुष महाराष्ट्रदेशी अवतरला हे इथल्या रयतेचे भाग्य!