"हाताच्या तळव्यावर सहज मावणारी छोटीशी वस्तू म्हणजे ‘चिप’. या चिपच्या आकारावर मात्र जाऊ नका! तिच्यामध्ये काय काय करामती करण्याची क्षमता असते याचा विचार जरी केला तरी आपली मती गुंग होऊन जाईल. एका सेकंदात अब्जावधी क्लिष्ट गणिती समीकरणं सोडवण्यापासून अनेक अवघड निर्णय घेण्यासंबंधीच्या कामांमध्ये मदत करण्यापर्यंत असंख्य गोष्टी या चिपमुळेच साध्य होतात. आजच्या जगामधलं जवळपास प्रत्येक काम या चिपच्याच मदतीनं होतं. संगणक, मोबाईल, दूरसंचार, प्रवास, मनोरंजन, वैद्यकीय उपकरणं, उद्योगक्षेत्र, संशोधन, आरोग्य, अंतराळ प्रवास अशी यादी करत गेलो तर संपणार नाही; पण यामधल्या प्रत्येक गोष्टीचं सामर्थ्य या चिपमध्येच दडलेलं आहे.
आयटी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सिलिकॉन व्हॅली’चं नावही मुळात या चिपमुळेच पडलेलं आहे. नेमकी काय करते ही चिप? ती आली कुठून? तिच्या जन्मामागे आणि त्यानंतरच्या आजवरच्या प्रवासामध्ये काय भन्नाट गोष्टी घडल्या? तिचं कामकाज कसं चालतं? या आणि यासारख्या असंख्य रंजक तपशीलांसह अत्यंत महत्त्वाच्या मुद्दयांचा सखोल उहापोह करणारं हे पुस्तक आहे.
यात अनेक नाट्यं भरलेली आहेत, अनेक शास्त्रज्ञांच्या मनोहर कहाण्या आहेत. याच्याच जोडीला ईर्ष्या आणि हेवेदावे यांचे पदरही आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे आपली तहान-भूक हरपून काहीतरी भव्यदिव्य करण्याच्या स्वप्नामुळे भारून गेलेल्या महान मानवांच्या प्रवासाचा आलेखसुद्धा आहे. याच्याच जोडीला त्यात तंत्रज्ञानही आहे आणि या विषयाला अनुरूप असं राजकारणही आहे!"