जीवन निराश व निरर्थक वाटणे, ही सर्वसामान्यपणे आढळणारी एक सार्वत्रिक घटना आहे. अशा पीडित व्यक्तीला प्रश्न पडतो ः ‘माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे?’ स्वतःच्या जीवनातील उद्दिष्ट शोधणे, ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात प्रबळ, प्राथमिक आणि जीवनयज्ञासाठी ठिणगी पुरविणारी प्रेरक शक्ती आहे. ‘लेगोथेरपी’च्या सिद्धांतासह (व्हिक्टर फ्रँकल), सुखाचा शोध (सिग्मंड फ्रॉईड) तसेच सत्तेची आकांक्षा (अॅडलर) यांची सांगोपांग चर्चा लेखकाने केली आहे. यातही जीवनाच्या हेतूचा-उद्दिष्टांचा शोध मिलरला अपार महत्त्वाचा वाटतो. आपण सर्व, जीवनात चार भूमिका बजावतो. पीडित, खलनायक, नायक आणि मार्गदर्शक! यातील प्रत्येक भूमिका साकारण्याचा अर्थ काय? योग्य व अर्थपूर्ण कृती कशी करावी? जीवनात आमूलाग्र परिवर्तन कसे करावे तसेच निर्धारित केलेली उद्दिष्टे कशी साध्य करावीत, या संबंधी लेखकाने केलेले विवेचन मूळातूनच वाचण्यासारखे आहे. व्यक्तीला त्याच्या जीवनकार्याची ओळख व्हायला डोनाल्ड मिलर मदत करतो. इतकंच नाही तर, पीडित व्यक्तीला त्याच्या आयुष्याची दिशा व अर्थ शोधायला मदत म्हणून लेखकाने अर्थपूर्ण जीवनाचा आराखडा (प्लॅनर) वाचकांच्या तळहातावर ठेवला आहे. डोनाल्ड मिलर, सीईओ ‘बिझनेस मेड सिंपल’ ‘ब्ल्यू लाईक जाझ’, ‘अ मिलियन माईल्स इन अ थाऊजंड् यिअर्स’, ‘बिल्डिंग य स्टोरी ब्रँड’ या बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक! नॅशविले, टेनिसी इथे ते आपल्या पत्नी (इलिझाबेथ) व मुलगी (एमेलिन) यांच्यासह वास्तव्यास आहेत.