इंडियाज एन्शन्ट पास्ट हे प्राचीन भारताचा इतिहास सांगणारे सुलभ आणि सर्वसमावेशक पुस्तक आहे. इतिहासाच्या लेखन करण्याच्या रचनेच्या संबंधातील मांडणीतील दृष्टिकोन, स्रोत, आणि त्यांचे महत्त्व यांपासून सुरुवात करून संस्कृती, साम्राज्ये आणि धर्म यांची सुरुवात कशी झाली ? त्यांचा विकास कसा झाला? याची ओळख या पुस्तकात करून दिलेली आहे. तसेच भूगोल, पर्यावरण आणि भाषिक पार्श्वभूमी यांचाही विचार केलेला आहे. त्या संदर्भात नव-पाषाणयुग, ताम्रपाषाणयुग, वेदकाळ, त्याचप्रमाणे हडप्पा संस्कृतीची माहिती समाविष्ट केली आहे. या पुस्तकात लेखक जैन, बौद्ध या धर्मांचा उदय, मगध आणि प्रादेशिक राज्यांचे आरंभ आणि मौर्य, मध्य आशिया खंडातील देश, सातवाहन, गुप्त, आणि हर्षवर्धन यांचे कार्यकाळ - या सगळ्यांचा समग्र ऊहापोह करतात. वर्णव्यवस्था, शहरीकरण, व्यापारविनिमय, विज्ञान आणि तत्त्वज्ञानातील विकास आणि सांस्कृतिक परंपरा या महत्त्वाच्या चमत्कृतिपूर्ण विषयांचाही ते आवर्जून परामर्श घेतात. ते प्राचीन काळातून मध्ययुगात झालेल्या स्थित्यंतराची विचक्षणा करतात आणि आर्य संस्कृतीचा उगम यासारख्या विषयांनाही हात घालतात. 'प्राचीन भारत' या विषयातील प्रख्यात तज्ज्ञ आर.एस. शर्मा यांच्या अत्यंत सोप्या आणि मनोरम भाषेतील या पुस्तकाचा अभ्यास विद्यार्थी आणि 'प्राचीन भारताचा इतिहास' शिकविणारे शिक्षक यांच्यासाठी अपरिहार्य ठरतो.