नोकरीत खर्ची पडणारं आपलं वय, तंत्रज्ञानाच्या प्रगतीला मानवाची प्रगती मानणारं आपलं मन, निसर्गापासून दुरावत चाललेलं आपलं जगणं, एकमेकांच्या वागण्याला वेसण घालणारं आणि स्वतःपासून अनभिज्ञ असं आपलं वागणं. आपली अस्वस्थता, असुरक्षितता आणि अगतिकता बघून वाटतं मानवाचा फोकस चुकलाय का ? आणि खरंच चुकला असेल, खरंच आपल्याला ते जाणवलं आणि आपण पुढे जाऊन आपली चूक सुधारायची ठरवली तर? तर जग बदलून जाईल, हळूहळू आणि स्वाभाविकपणे. काही शतकांनी इथे भौगोलिक सीमा राहिलेल्या नसतील, हिंसेची गरज नसेल, लैंगिकतेवर नियंत्रण नसेल, जेल नसतील, चलन नसेल, लग्न संस्था नसेल आणि तरी प्रेम असेल, उरेल, टिकेल. आणि तयार होईल 'प्रेमम' एक नवं जग. पण तरीही आजचे परंपरावादी लोक जंगलात दडून तगून राहिले असतीलच. त्यांचा पंथ 'प्रेमम' उलथवून टाकण्याची स्वप्नं पाहतच असेल. योग्य संधीची वाट बघत असेल. आणि आज ती संधी चालून आलेली आहे. प्रेमम उद्ध्वस्त करण्याचा घाट पंथाने घातलेला आहे. प्रेमम आणि पंथ एकमेकांच्या समोर आले आहेत. त्यांच्या एकमेकांना भिडण्याची ही गोष्ट आहे.