कीटकांच्या अद्भुत विश्वात तुमचं स्वागत आहे. आपल्या भवताली असून देखील आपल्यासाठी अनोळखी… तसंच त्रासदायक होत नाही तोवर दुर्लक्षित केलं जाणारं कीटकांचं हे विश्व! या कीटकांना जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला डास चावतो की डासी? मुंगीला दोन पोर्ट का असतात ? झुरळ त्याचे एट पॅक अॅब्ज कसं मेन्टेन करतं? ढेकूण किती दिवस उपोषण करू शकतो? माश्या मानवाला आजारी कश्या पाडतात? भुंगा खरंच लाकूड खातो का? कानात गेलेल्या गोमेला बाहेर कसं काढायचं? कोळ्याच्या जाळ्याचा धागा किती भक्कम असतो? ऊ व्यक्तीची साथ कधीच का सोडत नाही? वाळवीच्या राज्यामध्ये राणीपद कसं मिळतं? पृथ्वीवरून मधमाश्या नाहीशा झाल्या तर चार वर्षांमध्ये मानववंश नष्ट होईल हे खरं आहे का? अशा अनेक प्रश्नांना सोबत घेऊन आपण कीटकांच्या विश्वाची रंजक सफर करूया. वाचनाचा किडा असलेल्या प्रत्येक चोखंदळ वाचकाला इथं पोटभर मेजवानी मिळेल आणि पुस्तक वाचून झाल्यावर त्याला शाहरुखच्या स्टाईलमध्ये म्हणावं वाटेल… “मी वाचलं. तुम्ही वाचलं का?? की की की की कीटक…”