कविता राव यांच्या 'लेडी डॉक्टर्स'मध्ये अनेकविध गोष्टींचं संमीलन झालेलं दिसतं : असामान्य स्त्रियांची प्रभावित करणारी वेधक कहाणी, सामान्य मुलींनी प्रतिकूल आणि कष्टदायक परिस्थितीमधून अफाट निर्धारानं केलेलं मार्गक्रमण, त्यांनी नवनवीन क्षेत्रांमध्ये पादाक्रांत केलेली शिखरं हा वृत्तान्त वाचायला मिळतोच, पण त्याचबरोबर हे पुस्तक डोळ्यांत अंजन घालणारंही आहे. भारतीय इतिहासात तथाकथित पुरुष हीरोंना जितकं स्थान दिलं जातं, तितकंच महत्त्व ह्या अप्रकाशित, वंचित, विस्मृस्तीत गेलेल्या बुद्धिमतींनाही मिळायला हवं ह्याची आठवण करून देणारं पुस्तक आहे हे.' आज भारतीय स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात करीअर करत आहेत. ह्यात जगावेगळं वाटत नाही, पण आद्य महिला डॉक्टरांनी कशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल ह्याची कल्पनाही करता येत नाही. कुटुंब, जात आणि समाजाच्या बेड्यांनी त्यांना शतकानुशतकांपासून करकचून बांधून ठेवलं होतं. ही बंधनं तोडण्यासाठी त्यांना किती प्रयास आणि खडतर संघर्ष करावे लागले ही कथा सांगायलाच हवी होती. 'लेडी डॉक्टर्स'मध्ये कविता रावनं १८६० ते १९३० ह्या कालावधीतील सहा स्त्रियांचा अद्भुत, असामान्य जीवनप्रवास उलगडला आहे. 'स्त्रीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याची बौद्धिक क्षमताच नाही' ह्या गृहीतकाला आव्हान देणाऱ्या सहाजणी- जातीचा नियम तोडून समुद्रापार गेलेली आनंदीबाई जोशीपासून