सावकरांचे वर्णन किती प्रकारे करावे ? स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगता यज्ञ म्हणजे सावरकर ! सतत धुमसत असलेला तप्त ज्वालामुखी म्हणजे सावरकर ! ज्याच्या श्वासाश्वासात मातृभूमीचाच ध्यास, म्हणजेच सावरकर! तप्त, प्रदीप्त व्यक्तिमत्त्व, असामान्य कर्तृत्व, असीम धैर्य, पराकोटीचा त्याग, ऐकणाऱ्याला चेतविणारे अमोघ वर्तृत्व, रक्तात अंगार पेटविणारे लेखन, म्हणजे सावरकर ! 'कमला', 'गोमांतक', ‘रानफुले' सारखे काव्य रचणारे हळुवार मनाचे प्रतिभाशाली कवी म्हणजे सावरकर ! '१८५७ चे स्वातंत्र्यसमर', 'भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने', 'हिंदुपदपादशाही'सारखे ऐतिहासिक ग्रंथ लिहिणारे इतिहासकार म्हणजे सावरकर ! 'संन्यस्त खड्ग', 'उःशाप' सारखी समाजाचे प्रबोधन करणारी नाटके लिहिणारे नाटककार सावरकर ! 'काळे पाणी', 'मोपल्याचे बंड' (अर्थात मला काय त्याचे) अशा कादंबऱ्या लिहिणारे कादंबरीकार सावरकर ! विज्ञाननिष्ठ सावरकर, जातिभेद निर्मूलक सावरकर, भाषा सुधारक सावरकर, धर्मनिष्ठ सावरकर, कैद्यांना शिकविणारे शिक्षक सावरकर, विचारवंत सावरकर आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही अटक झालेले सावरकर ! (हे देशाचे दुर्दैव...!) आणि अत्यंत शांतपणे जीवनाचा त्याग करणारे सावरकर! त्यांच्या आत्मसमर्पणाचे राजकारण करून त्यांना हिणवणारे करंटे राजकारणी, सावरकरांचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न करणारे राजकारणी ज्या देशात आहेत ते देखील देशाचे दुर्दैवच! सावरकरांनी अंदमानात व्यतीत केलेल्या एकेका दिवसाची कहाणी म्हणजेच 'माझी जन्मठेप'. हे वाचून ज्याचे रक्त सळसळणार नाही तो देशभक्त नव्हेच !