"रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान, वेदपंडीत, कट्टर शिवभक्त अशा लंकेच्या राजाची कथा आहे. आजवरची पुराणे, कथा, साहित्य, कला यामधून रावणाला दुर्गुणी आणि अवगुणी प्रवृत्तीचे प्रतिक बनवलं गेलं. परंतु याच रावणाने रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडव स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती केली. एवढा विद्वान कित्तेक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला? सर्व देवांना पराभूत करणारा, सर्व दैत्य, दानव, असुर आणि कित्तेक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी कादंबरी, रावण राजा राक्षसांचा.
रावणाने बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावणसंहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्तोत्र, यातून ज्ञानाच्या नवीन कक्षा रुंदावल्या. दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून त्याने राक्षस संस्कृतीचा पाया रचला. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद, इत्यादी सारख्या अनेक विषयात पांडित्य मिळवूनही रावणाला खलनायक ठरवून रावणाची कायम उपेक्षाच केली गेली. अवहेलनेच्या फेऱ्यात गुरफटलेल्या त्याच्या आयुष्याचं सार वाईट विशेषणांची बरसात करत मांडलं गेलं. आजही हजारो वर्षांपासून रावण दहनाचा सोहळा आनंदाने साजरा केला जातो. विध्वंस हा कधीच चांगला नसतो, हे माहीत असूनही रक्ताच्या नात्यांसाठी रक्तचंदन कपाळी घ्यावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि वेळ पडली तर तत्वांसाठी मरावं आणि मारावही लागतं.
रावणाच्या आयुष्यात घडलेल्या घटना, आलेली अनपेक्षित वादळं, त्यानंतरही विचारांच्या झालेल्या चिंध्या जपत स्वतःच्या हिमतीवर तो लंकाधिपती झाला. इतर राजांसारखी त्याने एकट्याने सुखं उपभोगली नाहीत. त्याची जनताही सोन्याच्या घरात राहत होती. हजारो वर्षांपासून अनुत्तरीत असलेल्या रावणाच्या वैयक्तिक आयुष्याचा, व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा घेतला का कधी? त्याचे आयुष्य रोमहर्षक प्रसंगांनी आणि चित्तथरारक कर्तृत्वाने भारलेलं आहे. रावणाने स्वतःच्या बळावर सर्व देवांना पराभूत केलं होतं.
रावणाला न जाणता त्याची प्रतिमा जाळणाऱ्या लोकांच्या अज्ञानाची कीव येते. सीतेचे अपहरण केल्याचा दोष देताना रावणाने तिची विटंबना केली नाही, हे लोक का विसरतात?
कादंबरी वाचा आणि ठरवा… रावण खरोखरच खलनायक होता की स्वसामर्थ्यावर उभा राहिलेला महानायक…!"