प्राचीन भारताच्या दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या पहिल्या दोन महाकाव्यांपैकी वाल्मीकिरामायण हे आहे. दुसरे महाकाव्य महाभारत होय. कमीतकमी दोन हजार वर्षे भारताच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक वैभवाला या दोन महाकाव्यांनी शोभा आणली आहे कारण विविध आकृतिबंध असलेल्या साहित्यसंपदेच्या निर्मितीचे ही दोन महाकाव्ये मूलस्त्रोत बनले आहेत. संस्कृतमधील काव्याच्या अभिजात आकृतिबंधाचा पहिला व उत्कृष्ट नमुना म्हणजे वाल्मीकिरामायण होय. रामायणाचे मुख्य महत्त्व म्हणजे ते उत्कृष्ट काव्य आहे. भारतीय आणि विशेषतः संस्कृत काव्यरचनेचा पहिला आदर्श म्हणून त्याला मान्यता मिळाली. वाल्मीकी मुनी हे आदिकवी ठरले. वाल्मीकी मुनीने नारदाला प्रश्न विचारला, की ‘या पृथ्वीमध्ये गुणसंपन्न, सर्वश्रेष्ठ, शूर, दृढव्रत, चारित्र्यवान कोण आहे?’ या प्रश्नाचे या त्रैलोक्यसंचारी देवर्षी नारदाने उत्तर दिले, की ‘इक्ष्वाकू कुलातील राम हा आदर्श पुरूष आहे. सुंदर मस्तक, भव्य ललाट, विशाल नेत्र, मध्यम उंचीचा, सर्व देहावर अवर्णनीय कांती असलेला, विद्यापारंगत, राजनीतिज्ञ, सज्जनांचा संग्रह आणि दुर्जनांचा निग्रह करणारा, धर्म-अर्थ व काम या तिन्ही पुरुषार्थाचे योग्य पद्धतीने सेवन करणारा, प्रजाहितदक्ष व प्रजाजनांना अत्यंत प्रिय, देवासुरांना ज्ञात असलेली सर्व अस्त्रे जाणणारा व संग्रामात अजिंक्य, असा राम हा श्रेष्ठ पुरूष होय.’