"भारताच्या प्राचीन अध्यात्मविचाराला उजाळा आणणार्या, त्याचा आजच्या आधुनिक जगाशी मेळ घालणार्या तसेच भविष्यातील समन्वयातील मानव संस्कृतीची दिशा दर्शवणार्या स्वामी विवेकानंदांसारखा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखवता येणार नाही.
मानवमात्राला आपल्या स्वतःतील ईश्वरत्वाची जाणीव करुन देणे आणि व्यक्तीला आपल्या हरएक छोट्यामोठ्या कृतीत त्या ईश्वरत्वाचा आविष्कार करण्याचा मार्ग दर्शवणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे, असे ते नेहमी म्हणत असत!
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘तुम्हाला भारत माहिती करून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचे साहित्य आणि त्यांचे विचार तुम्ही काळजीपूर्वक समजून घेतले पाहिजेत! विवेकानंदांचे विचार सकारात्मक आहेत. त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही. जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे महात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भिड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात.’
विवेकानंदांची विचारसृष्टीला सर्वात मोठी देगणी म्हणजे वैश्विकतेचा आदर्श ही होय. त्याचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या दृष्टीची समावेशकता व समग्रता! ते कमालीचे वैश्विक आहेत. त्यांचे विचार हे वैश्विक आहेत. त्यांचे प्रेम वैश्विक आहेत. वंश, राष्ट्रीयत्व, धर्म, संस्कृती लिंग वा वय इत्यादी निरपेक्ष संपूर्ण मानवमात्राचे ते प्रतिनिधित्व करतात. मानवमात्राच्या सर्व प्रकारांकडे व श्रेणींकडे त्यांचे लक्ष असते, मानवी जीवनाच्या विविध बाजू ते लक्षात घेतात., आणि मानवी अस्तित्वाच्या मूलभूत समस्यांचे ते चिंतन करतात."