"शुक्रवारी रात्री रॉजर अॅक्रॉयडचा खून झाला. त्यानंतर दुसर्या दिवशी मिस फ्लोरा यांनी अॅक्रॉयड यांच्या खुनाचा तपास करण्याचं काम माझ्यावर सोपवलं, तेव्हा मी डॉ. शेफर्ड यांना घेऊन फर्नली पार्कवर आलो. मी सर्वत्र पाहणी केली. गच्चीवर गेलो. मला तिथे खिडकीवर बुटाचे ठसे दिसले. नंतर मी ‘समर हाऊस’ मध्ये गेलो. तिथं मी कसून शोध घेतला. तिथं मला दोन वस्तू मिळाल्या. स्टार्च केलेला कापडाचा तुकडा आणि हंसाच्या पिसाचा टाक! पार्लरमेड सोडनऊ ते दहा वाजपर्यंत आपल्या रूममध्ये होती, असं ती सांगते. अर्थात याला पुरावा नाही. ती ‘समरहाऊस’मध्ये गेली असली तर? डॉ. शेफर्ड यांच्या सांगण्यानुसार, त्या रात्री बाहेरून कोणीतरी स्टडीरुममध्ये आलं होतं! तो अनोळखी माणूस डॉक्टरांना भेटला. मिस रसेल, उर्सुला पॅटन यांची मी काळजीपूर्वक चौकशी केली. त्यातून तपासाला एक दिशा मिळाली.
उर्सुला बर्न यांच राल्फ पॅटनशी लपूनछपून झालेलं लग्न, रॉजर अॅक्रॉयड यांचा खून झाला, त्या दिवशीच त्यांनी फ्लोरा बरोबर, राल्फचा वाङ्गनिश्चय करण्याचा घेतलेला निर्णय...या सार्या गोष्टी लक्षात ठेऊन या केसकडे बघावे लागेल. हे पहा, ज्या व्यक्तीला अॅक्रॉयड यांनी डिक्टाफोन खरेदी केला आहे, हे माहिती आहे आणि जी व्यक्ती अॅक्रॉयडला खूप जवळून ओळखते आहे तसेच ज्या व्यक्तीला यंत्र-तंत्रात रस आहे, ज्या व्यक्तीला खंजीर लांबवण्याची संधी होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी व्यक्ती मिसेस फेरार्स यांना ब्लॅकमेल करीत होती...अशीच व्यक्ती ही खूनी आहे, हे अगदी निश्चित!’"