तुमचे जसे विचार असतात, तसेच तुम्ही बनता! विशिष्ट दिशेने व दृष्टीने प्रेरित व प्रवाहित झालेले आणि तुमच्या तीव्रतम इच्छाशक्तीसह दृढ विश्वासातून गतीमान होणारे विचार तुम्हाला श्रीमंतीकडे नेणार आहेत. श्रीमंत-वैभवसंपन्न, कलासंपन्न, आरोग्यसंपन्न तसेच हृदयसंपन्नतेत जीवन जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. प्रश्न असा आहे की, तुमच्या मनात श्रीमंत होण्याची तीव्रतम इच्छाशक्ती आहे का? याचे उत्तर जर होकारात्मक असेल, तर त्या त्या इच्छाशक्तीला-विचारांना तुमच्या मनात खोलवर रुजवा! तुमची प्रेमातून उद्भवलेली कृतीशीलता, तुमचे विकसित होत जाणारे कौशल्य, तुमची प्रयोगशीलता, तुमची कळकळ, कृतज्ञशीलता तसेच तुमचा उत्साह यासह तुम्ही कार्यमग्न राहिले पाहिजे. अर्थात या प्रवासात तुम्ही संघर्षाला थेंबभरदेखील थारा देता कामा नये! लक्षात घ्या, मनातील वैभवशाली प्रतिमेवर तुमचा जर दृढ विश्वास असेल, तर तुम्हाला श्रीमंती सहज प्राप्त होईल, असा माझा दावा आहे. हेच माझे श्रीमंत होण्यामागचे शास्त्र आहे आणि ते मी माझ्या अनुभवातून विकसित केलेले आहे.