प्राचीन सभ्यतांच्या अवशेषांपासून ते जागतिक पटावरची 'सुपरपॉवर' होण्याच्या वाटेवर असलेल्या भारताचा ५,००० वर्षांचा इतिहास सर्वांत प्राचीन सभ्यतांपैकी एक असलेला आणि जगातली सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत देश. ५,००० वर्षांच्या, अद्भुतरीत्या प्रचंड आणि गुंतागुंतीच्या इतिहासामुळे विणल्या गेलेल्या अनेक प्रथा, वंश, जाती, भाषा आणि आध्यात्मिक श्रद्धा यांचं मिश्रण असलेला भारत. सर्वांत सुरुवातीच्या काळातला मानव, हडप्पा सभ्यता, ते मुस्लीम राज्यकर्ते, महान मुघल साम्राज्य ते ब्रिटिश राजवट, स्वायत्ततेसाठी देशाचा संघर्ष ते वर्तमानकाळातील आशा-आकांक्षा आणि आव्हानं... जॉन झुब्रझिकी यांनी ५ सहस्रकांमधल्या देव-देवता, बंड, युद्धं, महान साम्राज्यं, उतरती कळा लागलेले राजवंश, घुसखोरी आक्रमणं, सथलांतरं, वसाहतवाद आणि स्वातंत्र्यलढा हे सगळं अत्यंत कुशलतेने आणि रसाळ शैलीत संक्षिप्तरूपात मांडलं आहे. भारतीय इतिहासातले गुंतागुंतीचे आणि विरोधाभासी पदर त्यांनी, बुद्ध, अलेक्झांडर द ग्रेट, अकबर, क्लाइव्ह, टिपू सुलतान, लक्ष्मीबाई, कर्झन, जिन्ना, महात्मा गांधी अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या माध्यमातून जिवंत केले आहेत. त्याचबरोबर गंगा, राजस्थानच्या वाळवंटातले राजवाडे, हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं आणि दंतकथांमधल्या भारतीय सभ्यतांचे अवशेष यांची जिवंत पार्श्वभूमी या कथनाला लाभली आहे.