सेनेकाच्या कविता, त्याचे निबंध, तसेच त्याची पत्रे उपलब्ध आहेत. सेनेकाची पत्रे हा साहित्याचा व तत्त्वज्ञानाचा मोठा ठेवाच आहे. त्याच्या पत्रांतून मोठी सखोल जीवनभाष्ये, तत्त्वज्ञान ओतप्रोत भरलेले आहे. त्याच्या आशय-विषयात विलक्षण विविधता आहे. सेनेका वाचकांना आत्मशोधासाठी, आत्मोन्नतीसाठी, तसंच स्वतःला जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. यामध्ये आंतरिक प्रवास हा खूप महत्त्वाचा आहे. ती जीवनाची अंतर्यात्रा आहे. या अंतर्बोधातूनच स्वतःला जाणण्याचं महत्त्व हे पुस्तक अधोरेखित करतं. आनंदी जीवन, आयुष्याची क्षणभंगुरता, मृत्यू, भविष्य, क्रोध, क्षमाशीलता आणि निसर्गविज्ञानामध्ये येणारे प्रश्न, तसेच सांत्वनपर पत्रे, शोकांतिका अशा एक ना अनेक गोष्टींना सेनेकाने स्पर्श केलेला आहे. जीवनाच्या सर्व पैलूंची समग्रतेने जाणीव करून देणारं, प्रेरणादायी असं हे पुस्तक आहे